राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात; सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून अभिवादन
वृत्तसेवा
तिवसा, दि. ३० : मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. ३०) गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांनी महासमाधीस्थळी एकाचवेळी दोन मिनिटे स्तब्ध राहून मौन श्रद्धांजली अर्पण केली. सायंकाळी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. ‘श्री गुरुदेव की जय’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषाने दुमदुमलेल्या आश्रमात मौन श्रद्धांजलीच्या वेळी मात्र सर्वत्र निरव शांतता पसरली होती.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने आयोजित हा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडत आहे. राज्याच्या विविध भागांतून पालख्या, दिंड्या आणि पताकांसह लाखो भाविक गुरुकुंज आश्रमात दाखल झाले होते. मौन श्रद्धांजलीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिवादन करण्याचा हा देशातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तीकुमार भांगडिया, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख गोपाल कडू, तसेच राज्यातील आजीवन व जीवन शाखांचे प्रमुख, प्रचारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, माजी आमदार यशोमती ठाकूर, नाना महाराज, अॅड. सचिन देव, रामप्रियाजी, विजयादेवी, आरती वानखडे आणि प्रहारचे संजय देशमुख यांच्यासह धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. मराठी पंचांगानुसार अश्विन वद्य पंचमीला घडलेल्या या घटनेच्या स्मरणार्थ मागील ५७ वर्षांपासून गुरुकुंज आश्रमात हा मौन श्रद्धांजली सोहळा अखंडपणे आयोजित केला जात आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांवर श्रद्धा असलेले विविध धर्म आणि पंथांचे भाविक दरवर्षी या दिवशी आश्रमात येऊन त्यांना अभिवादन करतात.
‘मज वेडची गुरुकुंजाचे। आवडतो मज कण कण तिथला।’ या राष्ट्रसंतांच्या संदेशाने प्रेरित होऊन भाविक खंजिरी भजन, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरात आश्रमात दाखल झाले. या सोहळ्यात राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याची आणि मानवतावादी विचारांची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून लाखो भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आली. सामुदायिक ध्यान आणि प्रार्थनेतून मानवता, समानता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्य कार्यक्रमापूर्वी महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद करण्यात आला. त्यानंतर मुख्य मंडपात शंखनाद झाला. दुपारी तीन वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ‘तुम बिन कौन है? अब नाथ तारलो’, ‘हम भारत की शान है’, ‘सच्चे सेवक बनेंगे हम’ आणि ‘जन्मोजन्मी हेची देई। विठोबाई माझे आई’ यांसारख्या भजनांतून राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सुमारे दोन तास लाखो भाविक ध्यानस्थ अवस्थेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सायंकाळी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी महाद्वारावरील घंटेचा निनाद होताच उपस्थित लाखो गुरुदेव भक्तांनी हात जोडून राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळाच्या दिशेने दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रवंदना आणि ‘आरती राष्ट्रसंता’ या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या महोत्सवात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मांच्या धर्मगुरूंनी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना सादर केल्या. जागतिक स्तरावर वाढत असलेल्या धर्मवाद आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समानता व मानवतेचा ध्वज उंचावण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. तसेच यात्रेतील दुकाने आणि ध्वनिक्षेपकही काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात निरव शांतता निर्माण झाली आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात हा भावपूर्ण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.











