महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून लाखो भाविकांची उपस्थिती; ५० टन भंडारा, खारीक-खोबऱ्याची उधळण
हातकणंगले प्रतिनिधी
हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यांची यात्रा गुरुवार, दि. २९ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली. गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून पुढील दोन दिवसही यात्रेचे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली.
यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ग्रामदैवताच्या ठिकाणी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात तलवारीची मिरवणूक काढून ती मंदिरात आणण्यात आली. मंदिर परिसरातील दगडी गादीवर विराजमान असलेल्या परांडे बाबांची भेट घेऊन त्यांना मंदिरात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर मंदिरात देवाची पूजा-अर्चा करण्यात आली.
यात्रेदरम्यान भाकणूक, हेमाड नृत्य, धनगरी ढोल आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यंदाच्या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी. तसेच सुमारे ५० टन भंडारा, खारीक आणि खोबऱ्याची उधळण करण्यात आली. या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
पट्टणकोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून दरवर्षी विविध राज्यांतून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दाखल होतात. यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्सवी वातावरणात यात्रेचा मुख्य दिवस उत्साहात साजरा झाला.











