नवनियुक्त प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार; मूल्यवर्धन प्रशिक्षण, अनापान साधना आणि प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन
प्रतिनिधी :
बामखेडा त. त. : माहे ऑक्टोबर २०२६ ची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र बामखेडा त. त. येथे पी. एम. सी. माध्यमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जिल्हा परिषद केंद्र शाळा बामखेडा त. त., अ. सु. पटेल प्राथमिक विद्यालय बामखेडा त. त. आणि पी. एम. सी. माध्यमिक विद्यालय बामखेडा त. त. यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्रीमती वंदना पाटील मॅडम होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. श्री. भावेश पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पी. एम. सी. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. ईशस्तवन आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रीमती सु. भ. कदमबांडे माध्यमिक विद्यालय, तोरखेडा येथील नवनिर्वाचित प्राचार्य एस. ए. पाटील सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रांतर्गत तोरखेडा, काकर्दा आणि देऊर या शाळांवर नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
यानंतर सुरुची भोजनाचा कार्यक्रम पार पडला. शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मागील शिक्षण परिषदेचा आढावा केंद्रप्रमुख श्रीमती वंदना सुरेश पाटील यांनी घेतला. केंद्रस्तरीय मूल्यवर्धन उजळणी शिक्षक प्रशिक्षण या विषयावर श्री. सचिन वाघ, श्री. देवेंद्र वाकडे आणि श्री. दीपक ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. अनापान साधना या विषयावर श्री. पंकज पाटील यांनी माहिती दिली. तसेच प्रशासकीय विषयांवर केंद्रप्रमुख श्रीमती वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह प्रशासकीय कामकाज, प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दत्तात्रय पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.











