छत्रपती संभाजीनगर विभागाचे नेतृत्व करत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाची विजयी कामगिरी; मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा
मानवत / प्रतिनिधी : मानवत येथील श्रीमती सरस्वतीबाई भालेपाटील माध्यमिक विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर विभागाचे नेतृत्व करत संघाने विजय मिळवला. या कामगिरीमुळे विद्यालयासह संपूर्ण मानवत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर नाव उज्ज्वल करण्याची संधी खेळाडूंनी मिळवून दिली. त्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल सर्व विजयी खेळाडू, संपूर्ण संघ, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक श्री. ज्ञानेश्वर रेंगे सर आणि मार्गदर्शक श्री. किशन भिसे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्या पालकांचेही कौतुक करण्यात आले.
खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, कौशल्य आणि सांघिक भावना यामुळे हे यश शक्य झाल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या यशाबद्दल मुख्याध्यापक आनंदकुमार नांदगांवकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









