१४ ते १५ हजार शिवसैनिक व शेतकरी आंदोलनात सहभागी; आमदार सिद्धार्थ खरात, नितीन बापू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक
मेहकर / प्रतिनिधी
कोरडा दुष्काळ, पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेलूबाजार येथे समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे १४ ते १५ हजार शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते.
शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, आमदार नितीन बापू देशमुख यांच्यासह इतर आमदार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
या आंदोलनाला शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, आमदार संजय देरकर, सहनगराध्यक्ष किशोर गारोळे, युवासेना प्रमुख आकाश घोडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अटक झाली तरी त्याची पर्वा नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कितीही वेळा अटक झाली तरी मागे हटणार नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.











