गवळीवाड्यातील देवकीनंदन अपार्टमेंटला चोरट्यांचे लक्ष्य; सोन्याचे दागिने आणि २५ हजार ५०० रुपये रोख चोरीला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोणावळा, प्रतिनिधी : लोणावळा शहरातील गवळीवाडा परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून तब्बल १४ लाख ५ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे मौल्यवान दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवळीवाडा येथील देवकीनंदन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहणाऱ्या नीलम सूर्यकांत कदम (वय ३५) यांच्या घरी ही घरफोडी झाली. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.४५ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी उचकटून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरट्यांनी लंपास केलेले दागिने व ऐवज
- ८ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र.
- ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार.
- सोन्याचा चोकर.
- कानातील विविध सोन्याचे टॉप्स आणि झुमके.
- सोन्याच्या दोन चेन.
- एकूण २ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या.
- रोख रक्कम २५ हजार ५०० रुपये.
अशा प्रकारे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी नीलम सूर्यकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करीत आहेत.
चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
शहरात घरफोडीच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी घराबाहेर जाताना दरवाजे आणि खिडक्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षित कुलूप व्यवस्थेचा वापर करावा. परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, सकाळच्या वेळेत झालेल्या या मोठ्या घरफोडीचा छडा लावून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान लोणावळा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.










