कपडे, दागिने आणि मिठाईच्या दुकानांत खरेदीचा उत्साह; झेंडूची फुले ६० रुपये किलो, तर उसाची ६० रुपये दराने विक्री
रिसोड प्रतिनिधी : दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरातील बाजारपेठा गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत असून शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिवाळीनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच दागदागिने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
दिवाळी पूजेसाठी आवश्यक असलेल्या झेंडूच्या फुलांची ६० रुपये किलो दराने विक्री झाली, तर सणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उसाची ६० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे फुलविक्रेते आणि शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहकांच्या वाढत्या उत्साहामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही चांगला व्यवसाय होत असून दिवाळीच्या निमित्ताने रिसोड शहरातील बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सणाचा आनंद, खरेदीचा उत्साह आणि बाजारपेठेतील गजबज यामुळे रिसोड शहरात दिवाळीचा माहोल निर्माण झाला आहे.









