उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम; माता-भगिनी, एकल महिला, शेतकरी व गरजू कुटुंबांच्या घरी दिवाळीचा आनंद
सातेफळ, प्रतिनिधी : समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांनाही दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने सातेफळ (ता. केज, जि. बीड) येथे दिवाळी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या माध्यमातून माता-भगिनी, गरजू व्यक्ती, एकल महिला, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरपोच दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या उपनेत्या तथा माजी आमदार संगीताताई ठोंबरे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रतिभाताई थोरात आणि तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असून समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून गरजू कुटुंबांच्या घरी जाऊन शिध्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थितीमुळे सण साजरा करताना अडचणी येणाऱ्या कुटुंबांना मदतीचा हात मिळाला.
यावेळी विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, युवासेना प्रमुख दत्तकुमार काकडे, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भांगे, सातेफळचे सरपंच कृष्णा थोरात, अनंत भांगे, मित्रपक्षाचे कार्यकर्ते डॉ. विनोद भांगे, फुलचंद चिंचकर, राम माचवे, गोकुळ गुरव आणि करण घाडगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या घरापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश पसरविणारा ठरला.











