वनविभागाच्या सतर्कतेला यश; शहापूरमध्ये दोन पिल्लांची मादीशी सुखरूप भेट, कोरेगाव वनविभागाची कौतुकास्पद कामगिरी
पिंपोडे : ऊसाच्या शेतात सापडलेली अवघ्या दहा ते बारा दिवसांची दोन बिबट्याची पिल्ले, आईपासून दुरावल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न आणि त्याच परिसरात पिल्लांचा शोध घेत भटकणारी बिबट्याची मादी… अशा परिस्थितीत वनविभागाने दाखवलेली सतर्कता, संयम आणि नियोजनबद्ध प्रयत्न अखेर यशस्वी ठरले. शहापूर (ता. कोरेगाव) येथे बिबट्याची मादी आणि तिच्या दोन पिल्लांची सुखरूप भेट घडवून आणण्यात कोरेगाव वनविभागाला यश आले.
शहापूर येथील शेतकरी पुरुषोत्तम मारुती माने यांच्या काळाकडा नावाच्या शिवारातील ऊसाच्या शेतात तीन दिवसांपूर्वी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसाच्या दाट पाचटात अवघ्या दहा ते बारा दिवसांची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली. अचानक समोर आलेल्या या पिल्लांमुळे ऊसतोड कामगारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पिल्ले अत्यंत लहान असल्याने त्यांना त्यांच्या आईपासून वेगळे करणे धोकादायक ठरू शकते, याची जाणीव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याची मादी पिल्लांना घेण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी येण्याची शक्यता लक्षात घेतली. त्यानुसार संबंधित परिसरात पाळत ठेवण्यात आली. दरम्यान, बिबट्याची मादी पिल्लांच्या शोधात घटनास्थळी आली होती; मात्र काही कारणास्तव तिने पिल्लांना सोबत नेले नाही. त्यामुळे वनविभागाने आवश्यक खबरदारी घेत दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
दरम्यान, वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी रात्री बिबट्याची मादी अडकली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, ऊसतोडणी मुकादम आणि ऊसतोड कामगारांच्या सहकार्याने मादीसह तिच्या दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. या प्रयत्नांमुळे आईपासून दुरावलेल्या पिल्लांना पुन्हा मादीची साथ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
या संपूर्ण मोहिमेत वनविभागाने दाखवलेली तत्परता, योग्य नियोजन आणि स्थानिक नागरिकांनी दिलेली साथ महत्त्वपूर्ण ठरली. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे हे कौतुकास्पद उदाहरण ठरले आहे. आईपासून दुरावलेल्या दोन चिमुकल्या बिबट्याच्या पिल्लांना पुन्हा मायेची साथ मिळाल्याने परिसरातून वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.











