२५ बचत गटांच्या एकजुटीतून दिवाळीनिमित्त साखर वाटप; महिलांच्या स्वावलंबनाचा अनोखा संदेश
एरंडोली, प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे आनंद, गोडवा आणि एकमेकांच्या सुखात सहभागी होण्याचा सण. याच भावनेला कृतीची जोड देत एरंडोली येथील गरुडझेप महिला ग्रामसंघाने दिवाळीनिमित्त साखर वाटपाचा आगळावेगळा उपक्रम राबविला. महिलांनी स्वतःच्या बचतीतून प्रत्येक सदस्याच्या घरात दिवाळीचा गोडवा पोहोचवून एकजूट, बचतीची शिस्त आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
गरुडझेप महिला ग्रामसंघात एकूण २५ बचत गट कार्यरत असून सर्व गटांचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत. या गटांमध्ये जमा होणारी बचत, व्याज, दंड आणि हप्त्यांच्या रकमेतून दिवाळीनिमित्त साखर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महिला सदस्याच्या घरी दिवाळीचा आनंद आणि गोडवा पोहोचावा, तसेच बचत गटांमधील एकजूट अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
महिलांनी नियमित बचतीच्या माध्यमातून जमा केलेल्या निधीचा अशा सामूहिक उपक्रमासाठी उपयोग केल्याने आर्थिक नियोजनासोबतच सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले. बचत गट केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता महिलांमध्ये सहकार्य, विश्वास आणि एकजुटीची भावना निर्माण करू शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
साखर वाटप कार्यक्रमावेळी माता भीमाई गटाच्या अध्यक्ष दीपाली शेंडगे, सचिव अनिता जठार, माता रमाई गटाच्या अध्यक्ष संध्या शिंदे, सचिव ऋतुजा शिंदे, राधाकृष्ण गटाच्या अध्यक्ष मंदा कोळपे, सचिव सुनीता पवळ, तसेच श्रीगणेश गटाच्या अध्यक्ष अश्विनी इथापे आणि सचिव अनिता पंदरकर उपस्थित होत्या.
यावेळी मीना शिंदे, लता शिंदे, उज्वला शिंदे, बबई शिंदे, शोभा शिंदे, सुमन कोळपे, मंदा शिंदे, गौरी शिंदे, मनीषा थोरात, रंजना शिंदे यांच्यासह बचत गटातील अनेक महिला सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या उपक्रमासाठी मोहन कोळपे, कुलदीप इथापे आणि पप्पू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
महिलांनी स्वतःच्या बचतीतून दिवाळीचा गोडवा अधिक वाढविल्याने एरंडोली गावात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामूहिक बचत, नियोजन आणि परस्पर सहकार्याच्या बळावर महिलांनी राबविलेला हा उपक्रम इतर गावांतील महिला बचत गटांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.










