एक डिसेंबरला बेलवंडी फाट्यावर रास्ता रोको; त्यापूर्वी कर्जत, करमाळा व श्रीगोंदा तहसील कार्यालयांवर आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा | प्रतिनिधी :
माणिकडोह बोगद्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती’ची स्थापना करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बोगद्याचे काम पूर्ण होण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची तयारी शेलार यांनी व्यक्त केली. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात येत्या १ डिसेंबर रोजी बेलवंडी फाट्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला करमाळा, कर्जत, पारनेर आणि श्रीगोंदा या चार तालुक्यांतील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माणिकडोह बोगद्याच्या कामासाठी सर्वानुमते कृती समिती स्थापन करून समितीच्या नेतृत्वाची जबाबदारी घनश्याम शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली.
बैठकीत बोलताना घनश्याम शेलार यांनी माणिकडोह बोगद्याच्या सुरुवातीपासूनचा इतिहास आणि सध्याच्या परिस्थितीची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. बोगद्याचे काम मार्गी लागण्यासाठी टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
त्यानुसार, २३ तारखेला कर्जत तहसील कार्यालयासमोर, २७ तारखेला करमाळा तहसील कार्यालयासमोर, तर ३० तारखेला श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १ डिसेंबर रोजी बेलवंडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.
माणिकडोह बोगद्याचा प्रश्न मार्गी लागावा आणि बोगद्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी चारही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीच्या शेवटी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.










