वर्षभर सत्तेत सहभागी असताना कारभार योग्य वाटला, मग आताच गैरव्यवहारांचे आरोप का? ऑनलाइन निविदा प्रक्रियेमुळे पारदर्शक कारभार सुरू असल्याचा दावा
आमदार माऊलीआबा कटके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही; विकासकामांनाच प्राधान्य देणार असल्याचे पाचर्णे यांचे स्पष्टीकरण
शिरूर | प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेतील सत्तेतून बाहेर पडलेल्या काही नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून, ते अंतर्गत राजकीय कलहातून केले जात असल्याचा पलटवार माजी सभापती तथा सार्वजनिक बांधकाम समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक अभिजीत गणेश पाचर्णे यांनी केला आहे. वर्षभर सत्तेत सहभागी असताना नगरपरिषदेचा कारभार योग्य वाटत होता, मग आता अचानक गैरव्यवहारांचा साक्षात्कार कसा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरपरिषदेचा कारभार कोणत्याही एका व्यक्तीच्या मनमानीने चालत नसून, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष नितीन मच्छिंद्र पाचर्णे, सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात असल्याचे पाचर्णे यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेतील आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असून, विकासकामांच्या निविदा व ठेकेही नियमानुसार ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दिले जातात. त्यामुळे नात्यागोत्यांना किंवा मर्जीतील व्यक्तींना कामे दिल्याचे आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. विकासकामांच्या बाबतीत सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या नावाचा राजकीय वापर?
प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या नावाचा काहीजण राजकीय स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने वापर करीत असल्याचा आरोप पाचर्णे यांनी केला. त्यांच्या नावाचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्यांनीच त्यांच्या विश्वासाला तडा दिला असल्याचे सांगत, या आरोपांमागील राजकीय हेतू नागरिकांनी समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार माऊलीआबा कटके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?
लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांना विनाकारण या वादात ओढून त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अभिजीत पाचर्णे यांनी केला. शिरूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदारांविषयी चुकीची चर्चा घडवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.
वाघोलीतून शिरूर नगरपरिषदेचा कारभार चालतो, अशा प्रकारचे आरोप करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, नगरपरिषदेचा कारभार शिरूरच्या हिताला प्राधान्य देऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच चालविला जात असल्याचे पाचर्णे यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न साकार झाल्याचा दावा
संघर्षयोद्धा स्वर्गीय माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याची भावना अभिजीत पाचर्णे यांनी व्यक्त केली. त्यांच्या सुनबाई ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची नगराध्यक्षपदी, तर पुतणे नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीमुळे युवा पिढीला राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. निवडीच्या दिवशी नागरिकांनी शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, ही राजकीय घडामोड काहींना रुचत नसल्यानेच वेगवेगळे आरोप आणि संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
पाचर्णे कुटुंबाचा चार दशकांचा राजकीय व सामाजिक प्रवास
पाचर्णे कुटुंबाचा शिरूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवास चार दशकांहून अधिक काळाचा असल्याचे अभिजीत पाचर्णे यांनी नमूद केले. या काळात कुटुंबातील सदस्यांनी आमदार, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मार्केट कमिटी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
या अनुभवाच्या जोरावर शहराचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोपांपेक्षा विकासकामांवर चर्चा व्हावी
राजकीय मतभेद असू शकतात; मात्र शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. केवळ राजकीय हेतूने आरोप करण्याऐवजी प्रत्यक्ष विकासकामांवर चर्चा व्हावी. नगरपरिषदेचा कारभार पारदर्शकपणे सुरू असून, नागरिकांचा विश्वास कायम राखणे आणि शिरूर शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे अभिजीत गणेश पाचर्णे यांनी सांगितले.
शिरूरचा विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून, तो कामातून दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.











