गढी परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीचा अपघात; ढोकवजगाववर शोककळा
गेवराई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी परिसरात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात भारतीय हवाई दलातील जवानाचा मृत्यू झाला, तर त्यांचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. गोविंद भागवत नेहरकर (वय ३०, रा. ढोकवजगाव) असे मृत जवानाचे नाव असून, गोपाळ नेहरकर (वय २६) असे जखमी भावाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद आणि गोपाळ हे दोघे भाऊ एकाच दुचाकीवरून प्रवास करीत असताना गढी परिसरात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गोपाळ यांना तातडीने गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोविंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
देशसेवेत कार्यरत असलेल्या गोविंद नेहरकर यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ढोकवजगाव परिसरात शोककळा पसरली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.











