कुरुंदवाडचे माजी नगरसेवक आवळे यांच्यावर पक्षाकडून संघटनात्मक जबाबदारी; निवडीनंतर सर्व स्तरांतून अभिनंदन
प्रतिनिधी : कुरुंदवाड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या असून, शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी कुरुंदवाड येथील माजी नगरसेवक राजू नायकू आवळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने ही निवड ‘सामना’ वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली.
राजू आवळे यांनी गेल्या दीड दशकाहून अधिक काळ कुरुंदवाड शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. सामाजिक कार्यातही ते सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर शिरोळ तालुक्याच्या पूर्व भागातील संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.
कुरुंदवाड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रखडलेल्या योजनांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठविला. यासाठी धरणे आंदोलनासह विविध आंदोलने, निवेदने आणि प्रशासकीय पाठपुराव्याच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांचे प्रश्न मांडले.
२०१९ मधील महापुराच्या काळात तसेच कोरोना महामारीच्या संकटात त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून मदतकार्य उभे करण्याचा प्रयत्न केला. गरजू नागरिकांना विविध प्रकारची मदत मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
शिवसेनेच्या कठीण काळातही पक्षाशी निष्ठा कायम ठेवत त्यांनी संघटनात्मक काम सुरू ठेवले. यापूर्वी त्यांनी कुरुंदवाड शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्याने पूर्व भागातील पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारण्यासह स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
राजू आवळे यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग, पाणीप्रश्नासाठी केलेला संघर्ष आणि पक्षातील संघटनात्मक योगदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड झाल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.











