पाटबंधारे विभागाचे २ लाख २० हजार ५०० रुपयांचे नुकसान; सुरक्षारक्षक नसल्याने देखरेखीवर प्रश्नचिन्ह
कुरुंदवाड | प्रतिनिधी
कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न २१ लोखंडी बर्ग्यांच्या चोरीमुळे ऐरणीवर आला आहे. पाणी अडविण्यासाठी बसविण्यात आलेले २१ लोखंडी बर्गे अज्ञात व्यक्तींनी काढून नेल्याने पाटबंधारे विभागाचे २ लाख २० हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. नदीची पाणीपातळी आठ फूट पाच इंच असताना ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बंधाऱ्यावरील सुरक्षाव्यवस्थेचा अभाव आणि संबंधित यंत्रणेच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजापूर बंधाऱ्याला एकूण ६६ गाळे असून, प्रत्येक गाळ्यात पाणी अडविण्यासाठी लोखंडी बर्गे बसविण्यात येतात. त्यापैकी २१ बर्गे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. एका बर्ग्याची किंमत १० हजार ५०० रुपये असून, चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत २ लाख २० हजार ५०० रुपये आहे. एवढ्या मोठ्या आकाराचे आणि वजनाचे साहित्य बंधाऱ्यातून काढून नेण्यात आल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाणी मोकळे करण्यासाठी की भंगार विक्रीसाठी?
या चोरीमागे शेतीसाठी पाणी मोकळे करण्याचा हेतू होता की लोखंडी बर्गे भंगारात विकून आर्थिक फायदा मिळविण्याचा उद्देश होता, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, चोरीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजापूर बंधाऱ्यावर यापूर्वीही पाणी अडविण्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्या वेळी कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बर्गे काढून पाणी प्रवाहित करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यामुळे आताच्या चोरीचा पाण्याच्या प्रश्नाशी काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाटबंधारे विभागाची पोलिसांत तक्रार
या प्रकरणी पाटबंधारे विभागाने कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेले बर्गे शोधणे, ते कोणी आणि कोणत्या उद्देशाने काढून नेले, तसेच त्यांची विल्हेवाट कुठे लावली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बंधाऱ्याला बर्गे आहेत; पण सुरक्षा आहे का?
कृष्णा नदीवरील महत्त्वाच्या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षक नसणे ही चिंताजनक बाब आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि नियमित गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा बंधाऱ्यावरील महत्त्वाचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.










