जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप; आदिवासी अस्मिता, एकता आणि परंपरेचा संदेश
विक्रमगड | प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत वसुरी अंतर्गत येणाऱ्या मालेपाडा येथे आद्य क्रांतिकारक, आदिवासी समाजाचे महानायक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या महान कार्याचे, संघर्षाचे आणि आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात संघर्ष करून आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकता आणि आपल्या हक्कांविषयी जागृती निर्माण केली. त्यांचे जीवनकार्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या जयंती सोहळ्यानिमित्त ‘आपले मानवाधिकार फाउंडेशन’चे पत्रकार सूरज बाळू चौधरी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि एकतेचा संदेश देण्यात आला. जयंतीनिमित्त मालेपाडा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे विचार हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे आणि संघर्षाचे प्रेरणास्थान आहेत!











