किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले; पहाटे धुके, रात्री गारठा आणि गावोगावी शेकोट्या
रिटकवली | प्रतिनिधी :
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, सातारा जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. गुलाबी थंडीचे रूपांतर आता बोचऱ्या थंडीत झाले असून, किमान तापमान सुमारे १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन चांगलेच गारठले आहे.
पहाटेच्या वेळी दाट धुके आणि दव पडत असून, सकाळी व रात्री थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. थंडीमुळे नागरिक रात्रीचे व्यवहार लवकर आटोपते घेत आहेत.
थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे सर्दी, खोकला, ताप तसेच त्वचा कोरडी पडण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये थंडीच्या काळातच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात थंडीचे आगमन झाले; मात्र अवघ्या काही दिवसांत तापमानाचा पारा वेगाने घसरू लागला आहे. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्याही काहीशी कमी झाली आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेता लहान मुले, विविध व्याधींनी ग्रस्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी किती वाढतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








