प्रलंबित पाच हजार रुपयांचे अग्रीम अनुदान तात्काळ द्यावे; वीजपुरवठा सुरळीत करून पीएम किसानचे रखडलेले हप्ते जमा करण्याची मागणी
माजलगाव | प्रतिनिधी :
माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजलगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस असून, प्रलंबित पाच हजार रुपयांचे अग्रीम अनुदान तात्काळ वितरित करावे, वीजपुरवठ्याची समस्या दूर करावी आणि पीएम किसान योजनेचे रखडलेले हप्ते त्वरित सुरू करावेत, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
अद्याप अग्रीम अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, तसेच लोडशेडिंगमुळे बंद असलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पीएम किसान योजनेचे रखडलेले हप्ते त्वरित जमा करावेत आणि या योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी कृषी विभागात स्वतंत्र अधिकाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात अनंत जगताप (युवा नेते, माजलगाव), राम शिंदे, खरात (आडगावचे सरपंच), दत्ता आढाव, नितीन घायतीकडक (उमरी गावचे युवा नेते), संजय पवार (लोणगाव), तात्या पंचाळ, सूर्यभान गायकवाड (मनुरवाडीचे उपसरपंच), अविनाश कांबळे (माजी सभापती) आणि बाबा मुरकुटे आदी सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे.











