आमदार विक्रम पाचपुते यांची शासनाकडे फोनवरून मागणी; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख
श्रीगोंदा | प्रतिनिधी : दुष्काळाच्या छायेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुधनासाठी श्रीगोंदा तालुका मोठा आधार ठरू शकतो. शासनाने पाणी उपशावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यास श्रीगोंदा तालुका स्वतःची गरज भागवून इतर तालुक्यांनाही मोठ्या प्रमाणावर चारा पुरवू शकतो, अशी महत्त्वपूर्ण मागणी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी शासनाकडे केली आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी शासनाशी दूरध्वनीवरून संवाद साधत हा मुद्दा मांडला.
या प्रयत्नात राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचा आवर्जून उल्लेखही आमदार पाचपुते यांनी केला.
श्रीगोंदा तालुक्यातील पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले आहे, असे आमदार पाचपुते यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन आणि चारा नियोजनाला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
श्रीगोंदा तालुक्यातील बागायती पट्ट्यात चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याची क्षमता आहे. पाणी उपसा बंदीमध्ये काही प्रमाणात सवलत मिळाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणावर चारा पिकांची लागवड करू शकतात, असा विश्वास आमदार पाचपुते यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा तालुक्यात चारा उपलब्ध झाल्यास शेजारील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळेल आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल.
चारा उत्पादनासाठी पाण्याचा मर्यादित आणि योग्य वापर करण्यास परवानगी देण्याबाबत शासन आणि जलसंपदा विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असा आग्रह आमदार विक्रम पाचपुते यांनी धरला आहे. पाणी उपसा बंदी शिथिल करण्याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे आता शेतकरी आणि पशुपालकांचे लक्ष लागले आहे.










