चार भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी फाउंडेशनचा पुढाकार; आर्थिक मदतीसह सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
येवला | प्रतिनिधी : आईपाठोपाठ वडिलांचेही छत्र हरपल्याने येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सारोळे खुर्द येथील भगरे कुटुंबातील चार भावंडांच्या आयुष्यात मोठे संकट उभे राहिले आहे. या कठीण प्रसंगी कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भाऊ नरेंद्र दराडे यांनी भगरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच आर्थिक मदत देत या चारही मुलांच्या शिक्षणात भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सारोळे खुर्द येथील बरड वस्तीवर राहणारे राजू कारभारी भगरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यापूर्वी काही दिवस आधी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्यामुळे कावेरी (वय १७) आणि जुळे भाऊ जीवन व पवन (वय ९) यांच्यासह चारही भावंडे आई-वडिलांच्या मायेपासून पोरकी झाली आहेत.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून घरात कमावणारे कोणीही नाही. त्यातच जुळ्या भावांपैकी एक जण दिव्यांग असल्याने मुलांच्या संगोपनाचा आणि शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
या परिस्थितीची माहिती मिळताच कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भाऊ दराडे यांनी भगरे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी मुलांचे सांत्वन करून कुटुंबाला आर्थिक मदत केली. तसेच भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्यास फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या भावंडांच्या भविष्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू असताना सामाजिक संस्थेने पुढाकार घेतल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
यावेळी योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, डॉ. विलास कांगणे, सतीश भोसले, राहुल भोसले, निवृत्ती वनसे, अश्विन भोसले, अमोल शिंदे, विलास भोसले, रावसाहेब भोसले, शुभम भोसले, ललित भोसले, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब जेऊघाले, रवी जेऊघाले, बाळू डांबळे आणि नाना पवार आदी उपस्थित होते.










