माजी आमदार राजकुमार पटेल यांचा ग्रामस्थांसह विरोध; आधी गावांना वीज, रस्ते आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी
चिखलदरा | प्रतिनिधी :
सतपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पसरलेले मेळघाट हे केवळ जंगल नसून विदर्भाच्या पर्यावरणाचे, पावसाच्या संतुलनाचे आणि जलस्रोतांचे महत्त्वाचे आधारस्थान आहे. या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, विविध प्रजातींचे पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात. अशा संवेदनशील भागात विकासाच्या नावाखाली होणाऱ्या हालचालींना आता स्थानिकांकडून विरोध होत आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी चिखलदरा तालुक्यातील आज नदीकाठच्या गावात माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी अदानी समूहाच्या हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या कामाला विरोध दर्शवत काम थांबवले. प्रकल्पामुळे पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मेळघाटचे पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून कोणतीही मोठी योजना पुढे नेता येणार नाही, अशी भूमिका राजकुमार पटेल यांनी मांडली. आधी गावांना वीज, पक्के रस्ते, शेतकऱ्यांना पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतरच जंगल व वन्यजीव संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन विकासाबाबत विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांनीही मेळघाटातील ग्रामीण, आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला प्राधान्य देणे स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अड नदीच्या काठावर सुमारे २२ ठिकाणी ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने जमीन व मातीची तपासणी केली जात होती. मडक्याजवळील गावात सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी मेळघाटसारख्या संवेदनशील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ड्रिलिंग केल्यास भूजल पातळीवर परिणाम होऊ शकतो, तसेच वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास, त्यांच्या हालचाली आणि जंगलातील शांतता यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
या प्रकल्पाचे पर्यावरणीय मूल्यांकन आणि स्थानिक नागरिकांची जनसुनावणी न घेता पुढील काम कसे सुरू ठेवता येईल, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मेळघाटचे जंगल, वन्यजीव आणि स्थानिकांचे हक्क यांना प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.











