नाशिक येथे २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक उत्साहात पार; समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा संकल्प
प्रतिनिधी :
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेची निवडणूक रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिक येथील महाराज श्री अग्रसेन भवन, अग्रवाल सभा, बनकर चौक, काठे गल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत श्री किशोर शिंपी यांची समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधवांनी नाशिक येथे उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या संख्येने झालेल्या मतदानामुळे निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निकाल जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच, “किशोर शिंपी… तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
निवडीनंतर नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष किशोर शिंपी यांनी सर्व मतदार बांधवांचे आणि समाजबांधवांचे आभार मानले. ते म्हणाले, “आजच्या मतदानासाठी नाशिक येथे आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहून मला बहुमताने अध्यक्षपदी निवडणाऱ्या सर्व समाजबांधवांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच माझी निवड झाली आहे. हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण समाजाचा विजय आहे. आपण दाखविलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. समाजाच्या विकासासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”
यावेळी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी पदाधिकारी, महिला भगिनी आणि युवा कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष किशोर शिंपी यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










