शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान; रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरण
पेण | प्रतिनिधी :
मराठा सामाजिक व सांस्कृतिक विकास मंडळ, पेण यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पेण तालुक्यातील मराठा समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठा समाज भवनातील स्व. भाई मोहनराव पाटील सभागृह, गणपतीवाडी, पेण, जि. रायगड येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसांचे वितरण करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार (राज्यसभा) धैर्यशीलदादा मोहनराव पाटील, पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण ज्ञानू पवार आणि जे.एस.डब्ल्यू.चे सीएसआर प्रमुख सुशील तेलंग उपस्थित होते.
यावेळी पेण शहर मराठा समाजाचे सचिव राहुल र. बोरकर, अध्यक्ष मयूर रा. सावळे, पेण तालुका मराठा समाजाचे सचिव सिताराम स. पाटील आणि अध्यक्ष पांडुरंग तु. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पेण तालुका व शहरातील सल्लागार मंडळाचे सदस्य, कार्यकारिणी समितीचे सदस्य, समाजातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.











