मुख्य रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन होत असल्याचा नागरिकांचा आरोप; नो एन्ट्रीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी :
मुक्ताईनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर ‘नो एन्ट्री’चे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने आणि ट्रक सर्रासपणे सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून, पादचारी आणि लहान वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अवजड ट्रक शहरात येत असल्याने मुख्य चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहनांना रोखण्याकडे वाहतूक पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येकडे केवळ पोलीस प्रशासनानेच नव्हे, तर मतदारसंघाचे आमदार आणि खासदार यांनीही तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी मुक्ताईनगरवासीयांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि ‘नो एन्ट्री’च्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.









