१ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे आंदोलनाचे आयोजन; मुख्यमंत्री व पेणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे शासकीय परवानगीची मागणी
गागोदे बुद्रुक | प्रतिनिधी :
शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरण रोखून प्रत्येक मुलाला मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क मिळावा, या मागणीसाठी सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र आणि अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा यांच्या वतीने १ डिसेंबर २०२६ पासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे बुद्रुक येथे शिक्षण हक्क सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्याग्रहासाठी आवश्यक शासकीय परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन समाजसेवक संदीप पाटील आणि संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना सादर केले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
समाजसेवक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी या सत्याग्रहाच्या पूर्वतयारीसाठी गावोगावी जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ग्रामीण भागात सभा घेऊन मोफत शालेय शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मध्यमवर्गीय तसेच सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाला विविध गावांतून प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
संपूर्ण देश महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचे स्मरण करत असताना, दुसरीकडे शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरण यामुळे सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे बंद होत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी वंचित, शोषित आणि स्त्री समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार करून सामाजिक समतेला बळ दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी शिक्षण हे जीवनाशी जोडलेले, श्रमप्रतिष्ठेवर आधारित आणि माणसाला स्वावलंबी बनविणारे असावे, असा विचार मांडला. याच विचारांच्या प्रेरणेतून प्रत्येक मुलाला शिक्षण हा मूलभूत हक्क मिळावा, या मागणीसाठी सत्याग्रह आयोजित करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समाजसेवक संदीप पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. या लढ्याला विद्यार्थी, पालक आणि पत्रकार बांधवांचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
१ डिसेंबर २०२६ रोजी पेण तालुक्यातील आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे गागोदे बुद्रुक येथे आयोजित शिक्षण हक्क सत्याग्रहात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाजसेवक संदीप पाटील आणि सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.











