स्त्री शक्ती मंचच्या वतीने सिंधी कॅम्प झोपडपट्टीत फराळ, ब्लँकेट व खाऊचे वाटप; लहान मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
कारंजा (लाड) | प्रतिनिधी :
दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घरात दिवे लावणे नव्हे, तर अंधारात जगणाऱ्या गरजूंच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करणे, हाच खऱ्या दिवाळीचा संदेश जपत स्त्री शक्ती मंच संघटनेच्या वतीने यंदाही गरजूंसोबत दिवाळीचा आनंद वाटण्यात आला. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शारदा अतुल भुयार यांच्या पुढाकारातून ‘फुल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
दरवर्षी दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांना फराळाचे वाटप करणे आणि थंडीच्या दिवसांत ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट देणे, हा उपक्रम शारदाताई भुयार यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे. मागील वर्षी मेळघाटातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांनी गरजू नागरिकांना फराळ, ब्लँकेट, कपडे, ड्रेस तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप केले होते. मैत्रिणींना सोबत घेऊन त्या विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
नुकतेच कारंजा येथील सिंधी कॅम्प परिसरातील झोपडपट्टीत जाऊन त्यांनी लहान मुलांना बिस्किटे व चॉकलेट, ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट आणि नागरिकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. या वेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू हेच या उपक्रमाचे खरे समाधान ठरले.
या उपक्रमात सौ. प्रतीक्षा देसाई, सौ. सविता मोरे आणि सौ. दाभाडे यांनी मनापासून सहकार्य केले. या सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत, अशा उपक्रमांतून मिळणारे समाधान पैशाने विकत घेता येत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यापुढेही शारदाताईंसोबत अशा उपक्रमांत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
स्त्री शक्ती मंचच्या संस्थापक अध्यक्षा तसेच रोटी फाऊंडेशनच्या विदर्भ महामंत्री सौ. शारदा अतुल भुयार यांच्या या उपक्रमाचे ज्येष्ठ आदर्श सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी अभिनंदन केले. सध्याच्या दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाईच्या परिस्थितीत निराधार व गरजू नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून त्यांचे आशीर्वाद मिळवणे, हाच खरा दानधर्म असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शारदाताई भुयार या पर्यावरण सेविका म्हणूनही कार्यरत असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. कारंजा शहरासह महाराष्ट्रातील विविध भागांत त्या सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज काही क्षणांत विरून जातो; मात्र गरजूंच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य कायम स्मरणात राहते. शारदाताई भुयार यांच्या या उपक्रमातून माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.










