रामराज्य सेवाभावी संस्था व सकल हिंदू समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचीही मागणी
प्रतिनिधी :
यावल येथे अंत्ययात्रा सुरू असताना काही व्यक्तींनी अडथळा निर्माण करून वाद घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रामराज्य सेवाभावी संस्था व सकल हिंदू समाज, रामपूर (फैजपूर) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२६ रोजी फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास यावल येथील श्रीरामनगर परिसरातील स्वर्गीय कमलाबाई सुधाकर घार यांच्या अंत्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक परंपरेनुसार भजन व वाद्यांच्या गजरात अंत्ययात्रा यावल शहरातील नगिना परिसरातील मुख्य रस्त्यावरून जात असताना मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष, सभासद आणि परिसरातील सुमारे १० ते १५ जणांच्या समूहाने अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच वाद्य वाजविणे आणि भजन बंद करण्यास सांगून अंत्ययात्रा पुढे जाऊ न देण्याची धमकी देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मेहतर समाजाच्या भावना दुखावणारी जातिवाचक वक्तव्ये करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईक व समाजबांधवांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अंत्ययात्रा अडवून अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मशिदीच्या ट्रस्टचे अध्यक्ष, सभासद तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या १० ते १५ व्यक्तींची ओळख पटवून त्यांची चौकशी करावी. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत लागू होणाऱ्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय घटनास्थळावरील दुकाने तसेच नगरपालिका किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवावे. भविष्यात अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक सलोखा आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचा आदर राखला गेला पाहिजे. सार्वजनिक रस्त्यावरून धार्मिक परंपरेनुसार अंत्ययात्रा काढताना अडथळे निर्माण होणे ही गंभीर बाब असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर महामंडलेश्वर श्री जनार्दनजी महाराज, पुजदेकर महाराज, राममनोहर दासजी महाराज, नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ, नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच रामराज्य सेवाभावी संस्था व सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.











