सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
धारणी | प्रतिनिधी :
धारणी तालुक्यातील शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरवस्था गंभीर झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आगामी मोती माता यात्रेपूर्वी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी केली आहे.
यासंदर्भात रोहित पटेल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून यात्रेच्या काळात या मार्गावरून ये-जा करणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रस्त्याची दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी. तसेच दुरुस्तीच्या कामात दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाला रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पटेल यांनी दिला आहे.










