मातीच्या रस्त्यावरून घसरून विद्यार्थी जखमी; पायऱ्यांचे काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलनाचा सतीश वाघमारे यांचा इशारा
श्रीगोंदा | प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील मेखणी (देवदैठण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टेकडीवरील या शाळेत जाण्यासाठी असलेल्या मातीच्या रस्त्यावरून पाय घसरून पडल्याने एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पायऱ्यांचे बांधकाम करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघमारे यांनी दिला आहे.
देवदैठण येथील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावाबाहेर एका टेकडीवर वसलेली आहे. टेकडीवर जाण्यासाठी पक्क्या पायऱ्यांची व्यवस्था नसल्याने लहान विद्यार्थ्यांना निसरड्या मातीच्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दि. २३ रोजी युवराज दीपक जाधव हा विद्यार्थी मातीच्या रस्त्यावरून घसरून पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि नाकाला जबर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघमारे यांनी यापूर्वीही अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळेत जाण्यासाठी पायऱ्या बांधण्याची लेखी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, लवकरात लवकर पायऱ्यांच्या बांधकामाला सुरुवात करावी. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.








