२८ नोव्हेंबरला प्रतिमापूजन व ध्वजारोहण; कै. अनिल पाटील शिंदे चषक भव्य एकेरी कॅरम स्पर्धेचेही आयोजन
लोहा | प्रतिनिधी :
देशपिता लहुजी साळवे यांची जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोहा शहरात २८ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, जुना लोहा येथील साठेनगरमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
यावेळी देशपिता लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून, ॲड. भीमराव मल्हारी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊराव कंधारे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून संतराम दाढेल, माजी नगरसेवक अनिल दाढेल, चांदू पाटोळे, उद्धव कंधारे, संदीप सावळे, चंदू धोगडे आणि गणेश दाढेल उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या समारोपानंतर दुपारी १२ वाजता कै. अनिल पाटील शिंदे चषक भव्य एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए. एन. घोडके यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा पोलिस ठाण्याचे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी गणेशराव पा. कदम राहणार आहेत.
स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये, तृतीय पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये व चषक, तर चतुर्थ पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये व चषक असे आहे. प्रत्येक ब्रेक टू आणि ब्लॉक टू फिनिशसाठी २०० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
ही स्पर्धा शेतकी निवास, मार्केट कमिटी, लोहा येथे होणार असून प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. प्रवेश शुल्क स्वीकारण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२६ आहे. स्पर्धा २८ ते २९ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवसांत खेळविण्यात येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक अनिल बालाजी दाढेल असून सूत्रसंचालन वैजनाथ पांचाळ (पोलीस पा. रायवाडी) करणार आहेत.
मातंग समाजनेते तथा आदर्श पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग दाढेल यांनी कॅरम खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.










