गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा उपक्रम; बालक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
हरपवडे | प्रतिनिधी :
गड-किल्ले म्हणजे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते आपल्या पराक्रमाचा, शौर्याचा आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हा महाराष्ट्राचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे. या इतिहासाची ओळख आजच्या तरुण पिढीला व्हावी, त्यांच्यामध्ये गड-किल्ल्यांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हरपवडे (विभाग–आजरा) यांच्या वतीने भव्य दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मोबाईलच्या दुनियेत रमलेल्या बालकांना आणि तरुणांना प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाची अनुभूती देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. माती, दगड आणि चिखलाच्या माध्यमातून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना सहभागी स्पर्धकांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि दुर्गनिर्मितीच्या कौशल्याची ओळख होण्यास मदत होत आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, मार्गदर्शन करणारे उमेश पाटील सर यांचे आणि परिश्रम घेणाऱ्या सर्व धारकऱ्यांचे आभार मानण्यात आले.
गड-किल्ले जपूया, इतिहास जाणून घेऊया आणि पुढील पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचवूया, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी धारकरी आदर्श हळवणकर, कुमार पाटील, अनिकेत लटम, प्रथमेश पोवार, जीवन कांबळे, समीर पोवार यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.











