बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाच्या एकदिवसीय शिबिराला प्रतिसाद; संघटनात्मक जाणीव आणि सामाजिक प्रबोधनावर मार्गदर्शन
तिवसा | प्रतिनिधी :
संघटित व असंघटित कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण करण्यासोबतच सामाजिक व वैचारिक प्रबोधन घडवून आणण्याच्या उद्देशाने बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, तिवसा शाखेच्या वतीने एकदिवसीय प्रबोधन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवारी (ता. २२) तिवसा येथील यादवराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर पार पडले.
शिबिराचे उद्घाटन बीईएफ ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. चरणदास सोळंके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बीईएफ ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. शोभराव रोकडे होते.
यावेळी शालवन पत्रिकेच्या संपादक निर्मला उबाळे, बहुजन विचारवंत रमेश बोरिकर, बीईएफ महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, राज्य सचिव सिद्धार्थ सुमन, सुभाष खाकसे, वर्धा जिल्हाध्यक्ष कमलेश कांबळी आणि उपाध्यक्ष गजानन गायकवाड उपस्थित होते.
शिबिरात मार्गदर्शकांनी कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर विचार मांडले. संघटनात्मक जाणीव निर्माण करणे, सामाजिक प्रबोधन करणे आणि आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना वैचारिक दिशा आणि प्रशिक्षण मिळावे, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे स्मारक समितीचे सचिव कैलास सोनोने यांनी केले. शिबिराच्या आयोजनासाठी बीईएफचे तिवसा तालुकाध्यक्ष संदीप चक्रनारायण यांच्यासह सुगत खाकसे, मुकुंद कठाणे, विनोद विघ्ने, अमोल मेश्राम, ॲड. निलेश गजबे, गुमफाबाई ढोणे, विलास मेश्राम आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.











