चिपळूण तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न; प्राथमिक गटात वहाळ हायस्कूलच्या विनया लोटले हिला प्रथम क्रमांक
चिपळूण | प्रतिनिधी :
सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी येथे चिपळूण तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे औक्षण आणि दीपप्रज्वलनाने झाली. या विज्ञान प्रदर्शनात २१४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राथमिक, माध्यमिक, दिव्यांग, शिक्षक आणि विद्यार्थी अशा विविध गटांतील १६२ विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या. प्रदर्शनात यश मिळविलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात हेच बालवैज्ञानिक संशोधक म्हणून पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन केले. आमदार शेखर निकम यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची माहिती घेतली. जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्राथमिक गटात वहाळ हायस्कूलच्या विनया बाळू लोटले हिने प्रथम, तर डेरवण हायस्कूलच्या क्षितिज किंजलकर याने द्वितीय क्रमांक मिळविला.
माध्यमिक गटात निवळी हायस्कूलच्या सार्थक पवार याने प्रथम, तर खेर्डी हायस्कूलच्या वेदांत पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला.
याशिवाय रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रयोगशाळा परिचर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थी गटांतील यशस्वी सहभागींचाही सन्मान करण्यात आला.
पंचायत समिती उपसभापती संदेश आयरे, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक मानसिंग महाडिक, चंद्रकांत सुर्वे, शालेय समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुर्वे, सदस्य मनोहर महाडिक, गटशिक्षणाधिकारी इरणक, उद्योजक रवी सुर्वे, नाना सुर्वे, विस्तार अधिकारी देसाई, पटेल यांच्यासह विभागातील पंचायत समिती सदस्य आणि केंद्रप्रमुखांच्या हस्ते यशस्वी सहभागींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळे यांनी केले. मुख्याध्यापक दळवी यांनी आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी निवळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.










