बलेनो आणि ब्रेझा कारचे मोठे नुकसान; राजेंद्र जोशी यांच्यासह चार जण गंभीर जखमी
प्रतिनिधी :
गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गंगापूर येथील सिद्धार्थ जिनिंगसमोर शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.५० वाजता दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आष्टी येथील विद्या राजेंद्र जोशी (वय ५८) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत राजेंद्र जयानारायण जोशी (वय ६३), कलावती जयनारायण जोशी (वय ८०) यांच्यासह अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बलेनो आणि ब्रेझा या दोन कारमध्ये जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघातात विद्या जोशी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत ब्रेझा कारमधील योगेश मनाळ हेही जखमी झाले असून, त्यांच्यावर गंगापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये बलेनो कार (एमएच २३ एडी ४२५१) आणि ब्रेझा कार (एमएच २० ईवाय ३३७३) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही कारची समोरासमोर धडक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे आष्टी येथील जोशी कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.










