वीजकपात आणि रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
कर्जत | प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा दिवसाआड केवळ सहा तास करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास करपडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. शिंपोरे, बाभूळगाव दु., मानेवाडी, करपडी, वैदान आणि आद्योतीसह परिसरातील गावांतील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.
महावितरणने २७ नोव्हेंबरपासून शेतीपंपांचा वीजपुरवठा दिवसाआड सहा तास करण्याबाबत संदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. नदीकाठच्या शेतांमध्ये कांदा, केळी, पेरू यांसह विविध पिके उभी आहेत. या पिकांची काढणी मार्चपर्यंत होणार असल्याने ऐन हंगामात वीजपुरवठा कमी झाल्यास पिकांना पाणी देणे कठीण होईल आणि केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून पिके उभी केली आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा कमी केल्याने पिकांच्या सिंचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतीपंपांना दररोज आठ तास वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
करपडी फाटा ते बाभूळगाव दु. या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावरून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका परिसरातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. खराब रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन रस्त्याचे तातडीने दुरुस्ती काम करावे, तसेच अवजड ऊस वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनाची दखल घेत महावितरणचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
केवळ आश्वासन देऊन प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत, तर मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
या आंदोलनात सरपंच निवृत्ती कानगुडे, उपसरपंच जालिंदर काळे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील काळे, माऊली सायकल, नितीन पाटील, धनंजय मोरे पाटील, आजिनाथ शेटे, कैलास शिंदे, अजित कानगुडे, तुषार गायकवाड, रोहन काळे, तानाजी काळे, बाळासाहेब माने, सत्यवान काळे, अमोल गायकवाड, गोरख कावळे, येताळा शेजाळ, नंदू माळवदकर, रामभाऊ माळवदकर यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे, रस्त्याची दुरुस्ती आणि अवजड ऊस वाहतुकीचा प्रश्न सोडविणे या मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. लेखी आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











