डॉ. अण्णा हजारे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात; पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन
येवला, दि. २९ नोव्हेंबर २०२६ :
पक्ष्यांचे संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ या उपक्रमाचा शुभारंभ २९ नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धी येथे डॉ. अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. हजारे यांची भेट घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्याबाबत चर्चा केली. पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये धान्य आणि पाणी ठेवून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मातीच्या भांड्यांचा वापर करून पक्ष्यांना अन्न-पाणी उपलब्ध करून देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
उन्हाळ्यातील उष्णता, पाण्याची कमतरता, वृक्षतोड आणि नैसर्गिक अधिवासांचा ऱ्हास यामुळे पक्ष्यांसह इतर जीवांना अन्न-पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी घराचे अंगण, गच्ची, शेत, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी मातीचे भांडे ठेवून त्यात मूठभर धान्य आणि पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे यांनी उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. राळेगणसिद्धी येथून सुरू झालेली ही चळवळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, शाळा आणि घरापर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मूठभर धान्य, घोटभर पाणी’ हा केवळ उपक्रम नसून पक्ष्यांप्रती संवेदनशीलता आणि पर्यावरणाची जबाबदारी जपण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये निसर्गप्रेम, जीवदया आणि पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यापुढे मंडळाच्या वतीने राज्यभर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था आणि पर्यावरण जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या प्रसंगी मंडळाचे सहसचिव डॉ. नानासाहेब गोफणे, राज्य मीडिया प्रमुख प्रा. चंद्रकांत भोजने, प्रा. भारत उगाडे, निर्मला वैद्य, वंदना भोजने, राज्य संघटक माही भोजने तसेच अन्य पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
राळेगणसिद्धी येथून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील विविध भागांत राबवून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.











