महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांचा सहभाग; पारंपरिक नृत्य व लोककलांतून संस्कृतीचे दर्शन
धारणी, दि. २८ नोव्हेंबर २०२६ : प्रतिनिधी –
आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आणि जल, जंगल व जमिनीच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती धारणी येथे साजरी करण्यात आली. आदिवासी युवा शक्ती संघटना (जयस) यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप तोटे यांच्या नेतृत्वाखाली जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मेळघाटासह मध्यप्रदेशातील विविध भागांतील आजी-माजी आदिवासी नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पेसा आंदोलनाचे नेते गंगाराम जांभेकर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले. ‘जय जोहार’ आणि ‘भगवान बिरसा मुंडा अमर रहे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाने शिक्षण, सामाजिक एकजूट आणि घटनात्मक अधिकारांबाबत जागरूक राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांच्या सहभागामुळे या कार्यक्रमात आदिवासी संस्कृती आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले.











