सकाळी ११ वाजता महाडीबीटी २.० पोर्टलवर नोंदणी सुरू; इच्छुक शेतकरी व पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला ३० नोव्हेंबर २०२६ रोजी पुन्हा सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
या योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. आता विभागाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही अर्जदाराचा अर्ज अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलेला नाही किंवा पोर्टलच्या डेटाबेसमध्ये नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे यापूर्वी अर्ज सादर केल्याचा किंवा योजनेचा लाभ मिळाल्याचा प्रश्न उद्भवत नाही.
अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्व पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांना अधिकृत प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करण्याची समान संधी उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार राबविण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
इच्छुक शेतकरी आणि पशुपालकांनी अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. अर्ज नोंदणीची तारीख, वेळ आणि पुढील सूचनांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलला नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज नोंदणीचा तपशील :
- दिनांक : ३० नोव्हेंबर २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजता
- अधिकृत पोर्टल : mahadbt.maharashtra.gov.in









