बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रमात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजन
केज : प्रतिनिधी
केज येथील बीड रोडवरील भगवान श्रीकृष्ण आश्रमाच्या वतीने कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आश्रमाच्या प्रांगणात होणार आहे.
या सोहळ्यात चोंडी, ता. धारूर येथील श्री सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थानचे कीर्तनकार ह.भ.प. आप्पा महाराज चौरे यांची कीर्तनसेवा होणार आहे.
चिंचोली माळी येथील विनोद अर्जुनराव राऊत आणि ह.भ.प. विष्णू महाराज शास्त्री हे अन्नदाते म्हणून सहकार्य करणार आहेत.
भगवान श्रीकृष्ण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








