
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळत नसल्याने तीव्र नाराजी..
चिपळूण (प्रतिनिधी):–विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळत नसल्याचे चित्र असून यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप व पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल असून शेकडो पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असून रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर केली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याने जिल्ह्यातील भाजपा व पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
तत्पूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघात गेली दोन टर्म वगळता वर्षं वर्ष भाजपचे वर्चस्व राहिले आहे या मतदारसंघात स्वर्गीय तात्या नातू यांनी या मतदारसंघावर आपला प्रभाव दाखवला आहे. यानंतर माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी देखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने गुहागर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत या मतदारसंघात भाजपला जागा मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती.
तर दुसरीकडे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर देखील गेली काही वर्ष भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी देखील केली. मात्र, भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत गुहागर व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर न केल्याने भाजप व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचे चित्र असून यामुळे भविष्यात भाजप व पदाधिकाऱ्यांसमोर पक्षवाढीच्या दृष्टीने आव्हान असणार आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला जागा मिळाव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. एकही जागा न मिळाल्यास शेकडो भाजप पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Discussion about this post