मूर्ती आगमनाची भव्य मिरवणूक जळकोट, दि.२२(सचिन कदम:) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवासी व पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. सुभाष बाबुराव शिरसागर यांनी स्वखर्चातून लाखो रुपये खर्चून श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम केले असून, या मंदिरात गुरुवार (दि.२४) रोजी श्री महालक्ष्मी मंदिर प्राणप्रतिष्ठान व भव्य कळसारोहन कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.जळकोट येथील हनुमान मंदिरनजीक एक जुने श्री महालक्ष्मी मंदिर होते. हे मंदिर पूर्णतः उघड्यावर होते.
या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा सुभाष शिरसागर यांनी संकल्प केला होता. या संकल्पानुसार स्वखर्चातून जवळपास दहा ते बारा लाख रुपये खर्चून नव्याने महालक्ष्मी मंदिर बांधले आहे.
या मंदिराच्या स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीची वाजत गाजत … फटाक्यांच्या आतिषबाजीत… हलग्याच्या निनादात… आराध्या मेळ्यांच्या उपस्थितीत गावातून मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक पार पडली. बुधवारी (दि.२३) रोजी भजन, देवीचा जागर व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
गुरुवारी (दि.२४) रोजी सकाळी ११ते १२ या वेळेत देवीची मूर्ती स्थापना व पूजन , अभिषेक व हवन कार्यक्रम पार पडणार आहे. जळकोट येथील श्री सिद्धेश्वर कट्टीमठ संस्थानचे मठाधिपती श्री. श्री.श्री.१०८ ष. ब्र. शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती स्थापना मंदिरात करण्यात येणार आहे. सोलापूर येथील प. पू. श्री. विद्याधर गवई महाराज हे पूजा विधी करणार आहेत.
दुपारी १ते २ यावेळेत कळसारोहन, ध्वजारोहण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तरी या श्री महालक्ष्मी देवी मूर्ती स्थापना, कलशारोहण व महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. सुभाष शिरसागर , माणिक आलूरे व समस्त ग्रामस्थ मंडळी यानी केले आहे.
Discussion about this post