धुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांसह राज्यभरातच जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे, युती व आघाडीत तीन – तीन प्रमुख पक्षांचा समावेश असल्याने एकेका पक्षातल्या दोन – तीन – चार इच्छूकांपैकी कुणातरी एकाला पक्षाचे अर्थात युती व आघाडीचे तिकीट मिळेल व नाराजांची संख्या प्रचंड वाढेल, ही बाब अपेक्षितच होती. मुळात राजकारण व सत्ताकारण हे फटाफट श्रीमंत होण्याचे साधन असल्याचे लक्षात आल्यामुळे राजकारणात उतरलेल्या प्रत्येकालाच नगरसेवक – नगराध्यक्ष – महापौर – आमदार – मंत्री – मुख्यमंत्री व्हायची घाई झालेली आहे. एका दुकानावर माल मिळाला नाही तर लगेच दुसरे दुकान जवळ करणाऱ्या ग्राहकां इतके आता राजकारणी आपला पक्षही बदलू लागले आहेत. पक्षाची विचारधारा वगैरे बाबी कधिच्याच गौण ठरल्या आहेत.
अमिताभ बच्चनचा एक डॉयलॉग आहे. ” मुझे तो सभी पुलिसवालोंकी शकले एकसी लगती है।” राजकीय पक्षांचे सध्या तसे झाले आहे. उमेदवारांतले काही – काही तिकीट मागताना एक्सपोजहोतात. एरव्ही मोठी एठ दाखविणारे हे महाभाग निवडणूक आली, की कुठल्या तरी राजकीय पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी, लाचारी पत्करून झडा मारतानाही दिसतात. लोकांची सेवा करण्यासाठी त्यांचे इतक्या झडा मारणे व लाचारी पत्करणे असते काय? असा कुणाचा समज असेल तर ते फारच इनोसंट आहेत असे म्हणावे लागेल. आज राजकारण हा ‘ माल लगाव – माल कमाव ‘ चा खेळ झाला आहे. हे स्थापित सत्य झाले आहे. त्यामुळे धीर कुणालाच नाही. ज्याला – त्याला आमदार व्हायची घाई झाली आहे. पंचवीस वर्षाच्या तरुणापासून नजीकच्या काळात अमरधामचे पाहुणे होणार असलेल्या बऱ्याच जणांना आमदार व्हायची घाई झलेली आहे. त्यामुळे कुणीच ऐकायला तयार नाही.राज्यात आमदार संख्या आहे २८८. युती व आघाडी मिळून तिकीटे वाटू शकतात ५७६. पक्षांमधूनच इच्छूकांची संख्या हजारांत आहे. शिवाय उर्वरित छोटे – छोटे पक्ष – अपक्ष भरपूर आहेत.
कुठे सामावणार एवढे जनसेवेसाठी झडा मारणारे आत्यंतिक इच्छूक नेते? युती – आघाडीत तर जागांचे वाटप – जागांची रस्सीखेच शेवटच्या क्षणापर्यंत चालली. इतिहासात नोंद व्हावी अशी ही रस्सीखेच झाली. तरी सुद्धा मैत्री पूर्ण लढती व सांगली पॅटर्न ठरलेलाच आहे. यातून अभूतपूर्व बंडखोरीचे चित्र तयार झाले आहे. युती – आघाडीमुळे जागांवर बंधने आल्याने अनेक तगडे इच्छूक उमेदवार तिकीटा वाचून राहून गेले आहेत. निवडून येण्याची क्षमता व खर्चाची तयारी हा निकष प्रमुख ठरला आहे. त्यामुळे पक्ष निष्ठा – निष्ठावंत वगैरे संकल्पनांना वेगवेगळ्या राजकीय पक्ष नेतृत्वानेच मुठमाती दिल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे बंडखोरांना ‘ तुम्ही थांबा ‘ हे सांगण्याचे नैतिक धैर्य पक्ष श्रेष्ठींकडेही फारसे राहिलेले नाही. कुणाला अधिकारवाणीने ते सांगु शकत नाही. काही ठिकाणी तर जागा वाटपात न मिळालेल्या जागी बंडखोरीसाठी पक्षाचीच आतून फुस असते. बंडखोर निवडून आला तर त्यानंतर तो स्वगृही परतणारच असतो.
राजकारण हा असतोच शह काटशहचा खेळ! या सर्वांचा परिणाम मोठ्या प्रमाणावरील बंडखोरीत झाला आहे. कदाचित सत्ता स्थापना प्रसंगी या बंडखोर व अपक्षांना खूप महत्व येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माघारीसाठी – समजावण्यासाठी – तडजोडी साठी – बोल्या सोडवून घेण्यासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर सोमवारी खरे चित्र स्पष्ट होईल. आजच्या स्थितीत राज्यात महायुती ३८ ठिकाणी व महाविकास आघाडीला १८ ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्यात धुळे जिल्हा – जळगाव जिल्हा – नाशिक जिल्हा – नंदुरबार जिल्हा सर्वच जिल्ह्यात ही समस्या आहे. या तीन दिवसात काय – काय घडेल, त्यावर माघारी अंती बंडखोरीचे वास्तव चित्र समोर येणार आहे.
Discussion about this post