
ही विधानसभा निवडणूक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठीचे युद्ध आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी विरोधकांना धूळ चारण्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. कर्जत – जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. त्या सभेमध्ये ज्योतिरादित्य शिंदे बोलत होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, मधुकर राळेभात, अंबादास पिसाळ यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे तीन पक्ष, त्यांच्यापासून सावध राहा; ज्योतिरादित्य शिंदेंची टीका
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, या निवडणुकीत देश आणि राज्याचा विनाश करणाऱ्या आघाडीला पराभूत करायचे आहे. त्यासाठी जागृत व्हा. जातीपातीमध्ये विभाजन करणारे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे आणि आरक्षण संपवण्याची भाषा करणारे असे महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि आता त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वसमावेशक विकासासाठी भाजपा प्रणित महायुती सरकार सत्तेत आणायचे आहे.
महायुती सर्वांसाधी तिजोरी खुली करणारी –
महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा उघड झाला आहे. विकास स्थगित करण्याचे काम करणारी महाविकास आघाडी एकीकडे, तर दुसरीकडे वेगाने विकास करणारे डबल इंजिन सरकार आहे. एकीकडे राज्याची तिजोरी रिकामी करणारी महाविकास आघाडी, तर दुसरीकडे सर्वांसाठी तिजोरी खुली करणारी महायुती आहे, अशा शब्दात ज्योतिरादित्य शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महायुती सरकारला निवडून देण्याचं जनतेला आवाहन
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे आहे. समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा विकास आणि प्रगती साधणाऱ्या महायुती सरकारला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले..
Discussion about this post