भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर – बोईसर विधानसभेतील तिरंगी लढत अत्यंत चुरशीची ठरली असून, अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी शानदार विजय मिळवला आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्याविरुद्धच्या लढतीत तरे यांनी तब्बल ४४,४५५ मतांनी मोठी आघाडी घेत मतदारसंघात भगवा फडकवला.
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, उद्धव ठाकरे गट, आणि शिंदे गट असे तीन प्रमुख पक्ष एकमेकांसमोर होते. राजेश पाटील यांनी आपल्या जुनी मतपेढी कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्याचवेळी, डॉ. विश्वास वळवी यांनी आदिवासी समाजाच्या पाठिंब्यावर भक्कम आधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी विलास तरे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले.
विलास तरे यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या प्रभावी लोकसंपर्क, विकासाची आश्वासने, आणि जनतेशी प्रामाणिक नात्याला जाते. तरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बोईसर मतदारसंघात अनेक विकासकामे हाती घेतली होती, ज्यामध्ये पायाभूत सुविधा उभारणी, जल व्यवस्थापन, रस्ते आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा यांचा समावेश होता याशिवाय, त्यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क साधत जनतेच्या अडचणी समजून घेत होते.
तिरंगी लढतीत विलास तरे यांनी १,२६,११७ मते मिळवली, तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील ८१,६६२ मतांवर थांबले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे डॉ. विश्वास वळवी यांनी ५०,५७१ च्या आसपास मते मिळवली. तरे यांचा ४४,४५५ च्या मताधिक्याने विजय हा त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे.
बोईसरच्या मतदारांनी त्यांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नेत्याला निवडून देत तिरंगी लढतीत स्पष्ट संदेश दिला आहे. या विजयानंतर विलास तरे यांनी जनतेचे आभार मानत, “हा विजय फक्त माझा नाही, तर बोईसरच्या जनतेचा आहे. येत्या काळात आणखी जोमाने विकासकामे राबवून मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन,” असे वक्तव्य केले.
विलास तरे यांच्या या विजयाने शिंदे गटासाठी मोठा आत्मविश्वास निर्माण केला आहे. बोईसर मतदारसंघात पक्षाच्या जनाधाराला बळ मिळाल्याचे दिसत आहे, ज्याचा आगामी निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो.
बोईसरच्या या ऐतिहासिक निकालाने मतदारसंघात नवी राजकीय दिशा दिली असून, तरे यांच्या पुढील कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post