

परभणीः परभणी शहरात 29 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. लाल सेनेच्या वतीने साहित्य संमेलनाची परंपरा मागील 20 वर्षांपासून सातत्याने सुरू असून संमेलनाचे हे 21 वे वर्षे आहे.
यावर्षी 29 डिसेंबर 2024 रोजी महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ तर स्वागताध्यक्ष म्हणून महात्मा फुले एज्यूकेशन सोसायटीचे सह सचिव अजय गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवडीची बैठक आज सकाळी 11 वाजता संपन्न झाली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. विजयराव गव्हाणे हे होते. या प्रसंगी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, लाल सेनेचे कॉ. गणपत भिसे, उत्तम गोरे, प्रकाश बनपट्टे, अशोक उबाळे, अविनाश मोरे, एल. डी. कदम, कोंडीबा जाधव, सिध्दांत भिसे, विकास गोरे, प्रदीप भिसे, अमन कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
समेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ यांची कोंडी, दोन एक्कर, पोशिंदा हे तीन कथा संग्रह आहेत. त्यांनी यापुर्वी लोकसंवाद मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, नांदेड, संत जनाबाई मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, परभणी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेले आहे. संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा या प्रसंगी शाल, पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.
मागील वीस वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, दलित, शोषित, उपेक्षित वंचिताची वेदना विचार मंचावर मांडून साहित्य सेवा करत असलेल्या आणि साहित्य सेवेमुळे शेत-बांधावरील वेदना नागर समाजापर्यंत पोचून त्याच्या सोडवणूकीसाठी झटणाऱ्या आणि त्यासाठी नवनवे मार्ग शोधून त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी दलित, उपेक्षित, वंचिताच्या बाजूनं बोलणारे, लिहिणारे, अनुनय करणारे आमच्यासाठी सदोदित प्रेरणास्त्रोत ठरलेले आहेत. आम्हाला प्रेरणा देणारे घटक अधिकाधीक गतीमाण व्हावेत यासाठी आम्ही विवीध मार्गाने प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नाचा भाग म्हणून मागील 20 वर्षांपासून महाराष्ट्रात राज्यस्तरीय अण्णाभाऊ विचार साहित्य संमेलनाची परंपरा सुरू ठेवली असून यावर्षीचे हे 21 वे संमेलन आहे.
परभणी शहरात संपन्न होणाऱ्या संमेलनात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे अवाहन कॉम्रेड गणपत भिसे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले आहे. यासंदर्भात 8 डिसेंबर रविवारी महात्मा फुले विद्यालयात बैठक संपन्न झाली होती. संमेलनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे..
Discussion about this post