दिलेल्या आश्वासनाला हरताळ ! राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांची व्यथा ! २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार
शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सामील व्हा – सुरेश पालकर
राम भोस्तेकर माणगाव
मार्च २०२३ मध्ये सांप्रत राज्य शासनाने, १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक यांच्या ७ दिवसांच्या संपात न भूतो न भविष्यती उद्रेक अनुभवला आहे. या नेमस्त परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करुन, राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दिर्घ चर्चा केली. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी “जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी-शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल” अशी लेखी हमी दिली. त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचारी-शिक्षकांनी पुन्हा १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपाची घोषणा केली.
सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात, “सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना” जाहीर केली. परंतु पुन्हा “येरे माझ्या मागल्या” प्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरुपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे साडे आठ लाख संबंधित कर्मचारी-शिक्षक संतप्त झाले आहेत. सुधारित पेन्शनच्या भवितव्याबाबत ते चिंतित झाले आहेत.
तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅच्युईटी द्या, १२ वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन/अंशराशीकरण पुनर्स्थापना करा, केंद्राप्रमाणे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात/अधिसूचना व्दारे नियुक्ती प्रक्रिया सुरु झालेल्या कर्मचारी/शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० करा, विविध संवर्गातील रिक्त असलेली ४० टक्के पदे कायमस्वरुपी नियुक्तीव्दारे भरा, विना अट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, शैक्षणिक विभागातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा, नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करुन, शासन निर्णय पारित केले जातील असे निसंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते. या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता तर लावल्या नाहीत ना ? अशी भावना सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे.
एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक कमालीचे संतप्त
आहेत. नाईलाजाने त्यांचा हा संताप गुरुवार दि. २९ ऑगस्ट २०२४ पासून “बेमुदत संप आंदोलनाचा” निर्णय काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला.कर्मचारी- शिक्षकांना दिलासा देणारी कार्यवाही करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा, अशी अपेक्षा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी या समयी व्यक्त केली.
या
राज्य समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रायगड जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक 29 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन रायगड जिल्हा सामान्य समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर , कार्याध्यक्ष डॉ.कैलास चौलकर, सरचिटणीस संतोष पवार, कोषाध्यक्ष संदीप नागे व निमंत्रक प्रभाकर नाईक यांनी आव्हान केले आहे
Discussion about this post