
खासदार रवींद्र चव्हाण यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी..
नांदेड :
आधारभुत दराने होत असलेल्या सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. खा. रवींद्र चव्हाण यांनी मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सन २०२४-२५ या हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीएफच्यावतीने
पणन महासंघामार्फत महाराष्ट्र राज्यात सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेली आहे. खरेदीपोटी शेतकऱ्यांची नाफेड नियुक्त एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी करण्यात येते. राज्य शासनाने शेतकरी नोंदणीची अंतीम मुदत १५ डिसेंबर २०२४ पर्यंत निश्चित केली असून या हंगामापासून नाफेड कार्यालयाने वर्जन २ मध्ये संपुर्ण खरेदी प्रक्रीया राबविण्याबाबत आदेशीत केलेले आहे. परंतु एनईएमएल या पोर्टल मधील बदलामुळे, ओटीपी प्राप्त होत नसल्यामुळे व वारंवार पोर्टल बंद असल्यामुळे
खरेदी-विक्री संस्थाकडे मोठ्या प्रमाणात नोंदणी विना अर्ज शिल्लक आहेत. दिलेल्या मुदतीत संपूर्ण शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होऊ शकत नाही. शेतकऱ्यांची नोंदणी पुर्ण न झाल्यास शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकणार नाही, त्यामुळे सदर शेतकरी केंद्र शासनाच्या आधारभुत योजनेपासुन वंचित राहण्याची शक्यता आहे. सोयाबीन खरेदी करीता शेतकरी नोंदणीस मुदतवाढ देण्याबाबत संबधितांना आदेशीत करावे, अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांनी या निवेदनाद्वारे केली आहे..
Discussion about this post