15 डिसेंबर सातारचे निर्माते अखंड हिंदूस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यदिन
दुर्दैवाची गोष्ट ही की यांच्या पुण्याईवर सारे सुखोपभोग भोगणार्याना ना यांची आठवण येते जयंतीला ना पुण्यतिथीला. पण कोण आणि काय बोलणार?
माणसे जन्माला आली ती मरण्यासाठी मग त्यांच्या आठवणींचे पाल्हाळ कशाला लावावे असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर काय उत्तर देणार? जाऊ दे अधिक बोलायला नको…….
आम्ही विसरभोळे का कृतघ्न?
17 वर्षे औरंगजेबाचे कैदेत राहिल्यानंतर सातारची गादी स्थापणारे संभाजी पुत्र शाहू महाराज यांची १५ डिसेंबरला पुण्यदिन याचे विस्मरण सातारकारांना व्हावे; याला कृतघ्नपणा म्हणावे का विसरभोळेपणा हे निश्चित ठरवणे अवघड आहे. फुटकळ नेते आणि कुठल्यातरी खबदाडात राहणार्या आणि ज्याला शेजारी राहणारे तरी ओळखत असतील का? असा प्रश्न ज्यांची चौकातून लटकणारी मुखकमले पाहून त्याकडे सवयीने दुर्लक्ष करणार्या सर्वसामान्याना निश्चितच पडत असेल. अनेकांच्या काही कर्तृत्व असो अगर नसो पण जयंत्या आणि मयंत्या करण्यात आमचे राजकीय आणि तथाकथित सामाजिक आणि सांस्कृतिक नेतृत्व आपली मुखकमलेही यानिमित्ताने कशी झळकतील याची काळजी घेत साजर्या करण्यात मनोभावे मग्न असतात. अनेकांच्या कर्तृत्व असो अगर नसो पण स्मारके, स्मृती स्तंभ याचे अनावरण जागोजागी होत असते अशा सार्याना सातारा हे गाव ज्यांच्यामुळे वसले आणि मराठ्यांची राजधानी म्हणून देशाच्या इतिहासात चिरंजीव झाले त्याचे कर्ते करविते छ. संभाजीपुत्र शाहू महाराज यांचे मात्र जाणते अजाणतेपणी विस्मरण व्हावे याचे दु:ख मानावे का आपल्या या जाणीवपूर्वक कोडगेपणापद्दल संताप व्यक्त करावा हे ठरवणे अवघड आहे. उत्तर कोकणात रायगडाखाली माणगाव जवळ गांगवली येथे संभाजीची पत्नी येसूबाई यांच्या पोटी १८ मे १६८२ रोजी शाहूंचा जन्म झाला. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून शाहू व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर 200 स्त्री-पुरुष सेवक शाहूंसोबत कैद झाले होते. औरंगजेबाने शाहूस राजा म्हणून मान्यता दिली आणि ७ हजारांची मनसबही दिली. औरंगजेबाची कन्या झीनत उन्निसाबेगम हिने शाहू व त्यांच्या परिवाराची चांगलीच काळजी घेतली.
शाहूंचे जन्म नाव शिवाजी असले तरी औरंगजेब त्यांना शाहूच म्हणत असे. औरंगजेब पुत्र आझम औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर पदारूढ झाला. त्याने झीनतउन्निसा व जुल्फिकारखान यांच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्यात छत्रपती पदासाठी अंतर्गत कलह माजविण्यासाठी शाहूंची सुटका केली. औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत परत आलेल्या शाहूंचे महाराष्ट्रात सर्वत्र स्वागत झाले. शाहू चाकणच्या किल्ल्यावर व नंतर चंदन गडावर आले. म्हणून ताराराणी आपल्या छत्रपती शिवाजी या पुत्रासह सातारा सोडून पन्हाळा गडाच्या आश्रयाला गेल्या. शाहूंनी सातारा काबीज केले. आणि 12 जानेवारी १७०८ मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून सिंहासनारूढ झाले. त्यांनी अष्ट प्रधान मंडळ नियुक्त केले त्यात बहिरोपंत पिंगळे यांस पेशवे पद व धनाजी जाधव यांना सेनापती पद दिले. तोपर्यंत सातारचा किल्ला किंवा मंगळाईचा किल्ला किंवा तत्कालीन आजमतारा आणि आज अजिंक्यतारा म्हणून ओळखला जाणारा किल्ला हा मराठी राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी प्राधान्याने कैदखाना म्हणूनच ओळखला जात होता. चांदबिबी पासून अनेक दिग्गजांना 12 व्या शतकात भोज राजाच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेल्यापासून कैदखान्याचेच रूप होते. त्या काळात या किल्ल्यावर त्याची राखण करण्यासाठी आणि रक्षण करणार्याची वस्ती असणारी गडकर आळी हा भाग सोडला तर जवळपास सातारा हा भाग निर्मनुष्य या सदरात मोडणारा होता त्याला मराठी राज्याची राजधानी बनण्याचे भाग्य मिळाले आणि ते एक शहर म्हणून विकसित झाले याचे एकमेव श्रैय्य हे फक्त आणि फक्त शाहूमहारांजांनाच जाते याचेच विस्मरण आपल्यासारख्या सामान्यांबरोबरच नेतृत्व करणार्या दिग्गजांनाही झाले आहे याला दैवदुर्विलास म्हणावे का कृतघ्नपणा हे सांगणे अवघड आहे. हे राज्यच नव्हे तर प्राधान्याने हे शहरही बसवणार्या या कर्त्याकरवित्याचे शाहू रस्ता नामक एक रस्ता सोडला तर एकही स्मारक त्याच्या कृतृत्वाची ओळख होईल असा एखादा फलक किंवा एखादे स्मृतिचिन्ह उभारावे असे आम्हाला वाटतच नाही हे कितीही नाकारले तरी वास्तवच आहे. चौकाचोकातून क्षणिक फुटकळ नेत्याच्या चेल्याचमच्यांची नामकरणे, स्मृतीफलक झळकवण्याची घाई झालेल्याना या शहराच्या आणि या मराठी राज्याची पुर्नस्थापना अतिशय नियोजन आणि चाणाक्षपणे करणार्या या महापुरूषाचे मात्र विस्मरण व्हावे याला काय म्हणावे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
15 डिसेंबर
अंखड हिदुस्थानचे छत्रपती शाहु महाराज यांना पुण्यदिना निमित्ताने त्रिवार मानाचा मुजरा
Discussion about this post