-आमदार राजेश पवार
[मतदार संघातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोडणार नाही]
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…
धर्माबाद-गेल्या पाच वर्षांमध्ये मला कटू अनुभव अधिक आले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना जात नसते, त्यांची जात फक्त पैसाच असते. पण सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळून पैसा कमावणाऱ्या माझ्या मतदारसंघातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी कदापी सोडणार नाही मग तो कुठल्याही जातीचा असो, जातीचे राजकारण कर्मचाऱ्यावरून करू नका, त्यांना तो चुकीचा वागत असेल तर समज द्या व एखाद्या कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर कुणाच्यातरी सांगण्यावरून अन्याय होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा त्या अधिकाऱ्यावर वा कर्मचाऱ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही.
कठोर निर्णय घेताना मी सत्यता पडताळली आहे पण ही सत्यता पडताळतांना तो कोणत्या जातीचा आहे हे मला माहीत नसते मला सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घ्यावयाचे असतात पण कठोर निर्णय घेतल्यानंतर सर्रास त्याला जातीपातीचे वलय दिल्या जाते. पण मी कुठल्याच जातीला मानत नाही माझी जात फक्त माणुसकीची व विकासाची असून आपण आपल्या मतदारसंघातील विकास माझ्यामार्फत करून घ्यावा असे रोखठोक प्रतिपादन आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद मध्ये शासकीय विश्रामगृहातील सत्कार समारंभाला उत्तर देताना केले.
राज्यभरात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नायगांव विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर शुक्रवारी (१३ डिसेंबर) पहिल्यांदाच धर्माबाद शहरास आ.राजेश पवार यांनी भेट दिली होती. यावेळी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना, मी केवळ हार,सत्कार मिरवण्यापुरता नसून तर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो आहे अशी प्रांजळ प्रतिक्रिया देत लगेच उपस्थित नागरिकांना आपापल्या गावातील प्रलंबित आणि अत्यावश्यक असलेली कामे सांगावीत असा आग्रह करत,भाषण न करता थेट नागरिकांच्या हातात माईक दिले. पहिल्याच भेटीत भाषण करीत न बसता थेट विकासकामांबाबत चर्चा सुरू केल्याचे पाहून उपस्थित नागरिक चांगलेच प्रभावित झाले होते.
विधानसभेच्या निकालानंतर आ.राजेश पवार यांचा कालचा हा पहिलाच दौरा होता, आगमनानंतर कैलास टेकडी येथील गोशाळेत गोमातेचे पूजन व महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली,यावेळी बूथ प्रमुख,ग्रामीण व शहरी पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर समारोपीय भाषणात त्यांनी नागरिकांशी चर्चा केली आणि येत्या जानेवारी महिन्यापासून विकासकामांचा धडाका सुरू करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासोबतच १०० दिवसांचा विकास आराखडा,प्रलंबित फेरफार लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. तर येत्या काळात नायगाव मतदारसंघाचा बारामती सारखा विकास करणार असल्याचे सूतोवाच ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी भाजपा कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांसह मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post