● आ. नमिता मुंदडा यांची विधानसभेत मागणी
अंबाजोगाई – केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत उमटले. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आज आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सभागृहात केली.
संतोष देशमुख यांच्या नृशंस हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरूला. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने जनतेत क्षोभ आहे. या हत्याकांडाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच उमटण्यास सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी आ. नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा करत हा गंभीर प्रश्न सभागृहात उचलला. आ. मुंदडा म्हणाल्या की, माझ्या मतदार संघातील मस्साजोग येथे दोन वेळेस सरपंच राहिलेले संतोष देशमुख हे अतिशय चांगले व्यक्ती होते. यांनी त्यांच्या गावात खूप चांगले काम केले आहे. अशा या लोकप्रिय व्यक्तीचे भरदिवसा राष्ट्रीय महामार्गावरून अपहरण झाले. तीन तासानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. अतिशय अमानवीय पद्धतीने मारहाण करून, हाल हाल करून त्यांचा खून करण्यात आला. देशमुख यांच्या खून प्रकरणी सात आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला. ९ डिसेंबरला हे प्रकरण झाले, मात्र आज आठ दिवस उलटूनही फक्त तीन आरोपी अटकेत आहेत, मुख्य आरोपीसह चार आरोपी अद्यापही फरार आहेत. या सर्वांना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. या घटनेमुळे जिल्हाभरातील लोकांमध्ये संताप आहे, भीती आहे. नागरिकांनी बंद पाळून, आंदोलने करून याचा निषेध नोंदवला. लोकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था याबाबत विश्वास देण्यासाठी सर्व आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी केली.
दोन वेळेस घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळेस भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी कारवी, सर्व दोषींना कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केल्याचेही आ. मुंदडा यांनी सभागृहात नमूद केले. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने कठोर पाऊले उचलावीत अशी विनंती देखील आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Discussion about this post